अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य नष्ट अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील मेहरुण परिसरात शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या आगीत घरातील कपडे, धान्य, गाद्या, चादरी तसेच दैनंदिन वापराचे सर्व साहित्य पूर्णपणे नष्ट झाले असून, कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानुसार, शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता भगवान बुधा कोळी यांच्या राहत्या घरात अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे स्पष्ट होत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अक्षय वंजारी यांनी तत्काळ पुढाकार घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वाहन चालक प्रकाश चव्हाण, अजय पाटील, देविदास सुरवाडे, रजनीश भावसार व इतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीची तीव्रता मोठी असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर आणि प्रभावी कारवाईमुळे आग शेजारील घरांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात यश आले. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता होती.
या दुर्घटनेत भगवान कोळी यांच्या घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्याला सहकार्य करत आग विझवण्यात हातभार लावला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
