साईमत / जयपूर
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात मुंबई–दिल्ली एक्स्प्रेसवेवर बुधवारी रात्री भीषण अपघात घडून पाच जणांचा जळून मृत्यू झाला. धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच वाहन जळून खाक झाले.
हा अपघात लक्ष्मणगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजपूरजवळ रात्री सुमारे ११ वाजता घडला. संबंधित कार सीएनजी आणि पेट्रोलवर चालणारी होती. प्राथमिक तपासानुसार, कारमधून अचानक सीएनजी गळती सुरू झाली आणि त्यानंतर भीषण आग लागली. काही सेकंदांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने आत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
या दुर्घटनेत तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व मृतक हे श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावचे रहिवासी असून वैष्णोदेवी दर्शन करून परतत होते. ते भाड्याच्या टॅक्सीतून आपल्या गावी जात असताना हा अपघात झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच चालक विनोद कुमार याने धावत्या कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र तो सुमारे ८० टक्के भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला सवाई मानसिंह रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, आगीची तीव्रता इतकी होती की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू असून सीएनजी गळतीमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
