साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
बोरिवली गोराई येथील पॅगोडाचे विश्वस्त मंडळाने संगनमत करून नवीन इमारत बांधण्यासाठी हिंदू देवता स्वयंभू वांगणा देवीचे मंदिर १४ मे २०२३ रोजी संभाजी महाराज जयंतीच्या दिवशीच अगदी मोगली पद्धतीने तोडून फोडून उद्ध्वस्त केले आहे. संबंधित विश्वस्त मंडळाच्या सर्व संचालकांना २१ ऑगस्टपर्यंत अटक करून कारवाई करावी, अन्यथा मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी संभाजी सेनेचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ आणि त्यांच्यासह असंख्य संभाजी सैनिक मंत्रालयाच्या आवारात आत्मदहन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
त्याठिकाणी वांगणा देवीचे भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना करून सर्व हिंदू समाज बांधवांसाठी दर्शनासाठी खुले ठेवावे. तसेच नारायण शहा, विमलचंद सुराणा, महासुख खंधार, शशिकांत संघवी, प्रीती डेंधिया, दुर्गेश शहा, वल्लभ भन्साली, बीमल केडिया, दिगंबर धांडे, कमलेश विकमसेय, योगेश अग्रवाल, प्रकाश सराओगी, प्रेमकुमार मोदी, मनोज बोतद्रा, लोकेश गोयंका या संचालक विश्वस्त मंडळाने संगनमत करून हिंदू देवतेचे मंदिर उद्ध्वस्त करून खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचेही लक्ष्मण शिरसाठ यांनी सांगितले.