साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील नागद रोड स्थित बाजार पट्टा भाग आणि झोपडपट्टी भाग अनेक वर्षांपासून घाणीचे व या भागात गटारी नसल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येते. येथील रहिवाशी गरीब लोकांच्या राहत्या घरात हे गटारीचे पाणी शिरते. गटारी तुटुंब घाण पाण्याने साचलेल्या आहेत. मात्र, याकडे नगरपरिषदेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. अनेकवेळा या भागातील अडचणी ‘साईमत’मधून वृत्त प्रकाशित केले आहे. मात्र, नागद रस्त्यावरील वस्ती बाजार पट्टा आणि झोपडपट्टी भागात येथील नगरसेवक आणि नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
नळांना पिण्याचे पाणी आले का सांडपाणी थेट या भागातील घरात शिरते. तसेच गटारीचे पाणी घरात शिरते. त्यामुळे लहान बालक व या भागातील रहिवाश्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या भागात दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. मात्र, या भागात प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसायला मिळते. निवडणुकीवेळी पुढारी या भागातील रहिवाश्यांना दरवेळी आश्वासन देत असतात. मात्र, या भागाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागात नगरपरिषदेने गटारी बनविलेल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास या भागात दुर्गंधी व सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. अशा सर्व समस्यांचे निवेदन ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना चाळीसगाव नगरपरिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांनी दिले आहे. मात्र, ते प्रश्न अद्यापही सुटलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.