लोकसभेच्या ९ निवडणुका जिंकलेले माणिकराव गावित यांचे निधन

0
1

साईमत लाईव्ह नंदुरबार प्रतिनिधी 

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा कॉंग्रेसकडून माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले होते.

कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता.
नंदुरबार हा आदिवासी पट्टा कॉंग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी नंदुरबारमधून करत. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे कित्येक वर्षे गावित यांनी प्रतिनिधित्व केले होते.

१९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे माणिकराव गावितानी केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे भूषविली होती. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी २०१४ पर्यंत पराभव पाहिला नव्हता.
२०१४ मध्ये सोळाव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हाही कॉंग्रेसच्या पहिल्याच यादीत माणिकराव गावित यांचे नाव जाहीर झाले होते. केवळ दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here