साईमत फैजपूर प्रतिनिधी
स्व.हरीभाऊ जावळे यांच्या प्रमाणेच अमोल जावळे हि शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात सवेंदनशील असुन ते कायमच शेती, माती आणि पाण्याच्या प्रश्नावर काम करत आहे हे पाहुन आम्हा सर्वांना स्व.हरिभाऊची प्रकर्षाने आठवण होत आहे. केळी पिक आणि केळी व्यवसाय हा जळगाव जिल्ह्याचा आणि त्यातही विशेषतः रावेर यावल तालुक्यांचा मुख्य कणा आहे.परंतु केळीवर येणारे विविध रोग बंची टॉप,सी.एम .व्ही,करपा,सिगा टाका लक्षात घेता आता शास्त्रोक्त पद्धतीने केळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.अन्यथा काळाच्या ओघात केळी पीक नष्ट होऊ शकते.असा धोक्याचा इशारा देत शेतकऱ्याने आता जागे होण्याची आवश्यकता आहे असे मत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि केळी तज्ञ डॉ.के.बी पाटील यांनी व्यक्त केले.
माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे मित्रपरिवार तर्फे फैजपूर येथे पार पडलेल्या केळी परिसंवादात ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय हरिभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, प्रांत अधिकारी कैलास कडलक,तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यावल, बंडू कापसे रावेर, प्रमुख मार्गदर्शक सोलापूर येथील प्रगतशील युवा शेतकरी किरण डोके, उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी तर आभार यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील यांनी मानले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले केळी उत्पादनासाठी रावेर आणि यावल हा परिसर अख्या देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि या पिकाच्या संदर्भात माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी जे प्रयत्न आणि योगदान दिले आहेत ते खूप कौतुकास्पद आहे. मार्केट मधील आपली स्पर्धा ही केवळ राज्य आणि देशा पुरता मर्यादित नाही तर आपल्याला संपूर्ण जगाचा विचार करावा लागेल. कृषी सह विविध औद्योगिक क्षेत्राला आपण कसे विकसित करू शकतो याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपली अर्थव्यवस्था आपल्याला आणखी गतिमान करण्याची गरज आहे. या परिसंवादातून जो काही अहवाल तयार होईल त्याला जिल्हा नियोजन मधे मांडून त्यावर काम करता येईल.
सोलापूर येथील प्रगतशिल शेतकरी किरण डोके म्हणाले शेती ही फायद्याची आहे.फक्त ती तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली तर फायद्याची ठरू शकते हा माझा स्वतःचा अनुभव आहे. शेती करावी पण ती क्वालिटीची करावी आणि आपण पिकवलेला माल हा एक्सपोर्ट कसा होईल याचा विचार करून शेतीचे नियोजन करावे. आपल्याला स्व-मालकीचे कोल्ड स्टोरेज निर्माण करता आले पाहिजे.म्हणजे आपण आपला शेत माल पाहिजे तसा स्टोरेज करू शकतो आणि त्यातून आपल्याला बाजारपेठेतील बदलणारे भाव कॅश करता येऊ शकतात. रावेर यावल तालुक्यातील जमीन ही केळी साठी पोषक आहेच. शेतकरीही मेहनती आहे फक्त निर्यात क्षम दर्जाची केळी उत्पादन यावर भर देण्याची गरज आहे असे सांगितले.यावेळी हिरालाल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना अमोल जावळे म्हणाले स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी आपल्या भागातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी केळी संबंधित जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या कडे जाऊन केळी करपा निर्मूलन चे अनुदान प्राप्त करून घेतले. हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन,यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करूया असे सांगितले.
या परिसंवादला रावेर,यावल,मुक्ताईनगर बोदवड,भुसावळ,चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे मित्र परिवारा तर्फे करण्यात आले होते. या वेळी अमोल जावळेंसह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष प्रतिनिधी व्यासपीठासमोर शेतकऱ्यांसोबतच बसलेले होते. स्व.हरीभाऊ जावळे यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.