नवी दिल्ली:
केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज (२४ जून) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीतील राजकीय वर्तुळात घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींमुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार लवकरच आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (Cabinet Reshuffle) करण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत.
जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा; तर बिट्टूंचा सस्पेन्स कायम
केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून रोजी संपला. भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने, काल (२३ जून) सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कुरियन यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी होती.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचाही कार्यकाळ संपला असून त्यांनाही भाजपने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. मात्र, बिट्टू यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. नियमांनुसार, खासदार नसतानाही ते पुढील ६ महिने मंत्रीपदावर राहू शकतात. बिट्टू यांनी आगामी काळात पंजाबच्या स्थानिक राजकारणात सक्रिय होण्याची आणि पुढील वर्षी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान-राष्ट्रपती भेटीमुळे चर्चांना उधाण
काल संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या चर्चांना प्रचंड वेग आला आहे.
फुटीर खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
या संभाव्य फेरबदलात एनडीए (NDA) सरकारला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षातील फुटीर खासदारांना मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
’आप’ (AAP): राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षातून फुटलेल्या ७ खासदारांना सरकारमध्ये संधी दिली जाऊ शकते.
तृणमूल काँग्रेस (TMC): टीएमसीच्या २८ पैकी २० लोकसभा खासदारांनी बंडखोरी करत त्रिपुराच्या ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’मध्ये (NCPI) विलीनीकरण केले असून एनडीएला पाठिंबा दिला आहे. या गटातील नेत्यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गट: शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या ६ खासदारांपैकी काहींची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते.
’एक व्यक्ती, एक पद’ सूत्राचा गाजावाजा; ‘या’ मंत्र्यांची गच्छंती होणार?
भाजपमधील ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाचा फटका काही विद्यमान नेत्यांना बसण्याची शक्यता आहे.
दिल्ली भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झालेले केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा
उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेले अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी
या दोन्ही नेत्यांकडे संघटनात्मक जबाबदारी आल्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दोन-तृतीयांश बहुमताचे गणित आणि आगामी निवडणुका
भाजप आणि एनडीए भविष्यातील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यांसाठी संसदेत दोन-तृतीयांश बहुमत (2/3rd Majority) गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांमधील फुटाफुटीमागे हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. तसेच, पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेता, प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणे साधण्यासाठी मोदी सरकार या फेरबदलाचा वापर करण्याची पूर्ण शक्यता आहे.
