साईमत न्यूज नेटवर्क –
लासलगाव – देशातील प्रमुख कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समिती येथे कांद्याच्या दरात शनिवारी मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत सरासरी दरात ७० रुपयांची घट नोंदवली गेली असून, कमाल दरातही ५० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत प्रतिकिलो १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शनिवारी सकाळपासून बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या कांदा खरेदी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षीप्रमाणे किमान २४.१० रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वाढलेला उत्पादन खर्च, इंधनाचे वाढते दर, मजुरी आणि महागाई यामुळे सध्याचा जाहीर दर परवडणारा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी बाजार समितीत ७७१ वाहनांतून ११ हजार ६९२ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी कांद्याला किमान ५००, कमाल १,६०० आणि सरासरी १,१५० रुपये दर मिळाला होता. मात्र शनिवारी आवकेत घट होऊन ४२५ वाहनांतून ६ हजार ५६६ क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला. तरीदेखील कांद्याचे दर घसरले. शनिवारी कांद्याला किमान ५००, कमाल १,५५१ आणि सरासरी १,०८० रुपये भाव मिळाला.
शेतकरी भारत दिघोळे यांनी सांगितले की, नाफेडमार्फत थेट बाजार समितीत कांदा खरेदी होणे गरजेचे आहे. मागील वर्षी २४.१० रुपये दर मिळाला होता, तर यंदा केवळ १२.३५ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. महागाई आणि उत्पादन खर्च वाढत असताना सरकारने अधिक दर देणे अपेक्षित होते. मात्र शासन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कांदा शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत असून, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळाल्याशिवाय शेतकरी टिकणार नाही, अशी भावना बाजार समिती परिसरात व्यक्त करण्यात आली.
