२ जुलैपासून नवे वेळापत्रक लागू
साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी
प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक सुसंगत करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कालका–साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि हावडा–साईनगर शिर्डी एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या साईनगर शिर्डी स्थानकावरील आगमन वेळेत बदल करण्यात आला आहे. हे नवे वेळापत्रक २ जुलैपासून लागू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक २२४५६ कालका–साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी आता २ जुलैपासून दररोज सायंकाळी ७ वाजता साईनगर शिर्डी स्थानकावर पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक २२८९४ हावडा–साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी देखील त्याच तारखेपासून सायंकाळी ७.३० वाजता साईनगर शिर्डी स्थानकावर दाखल होईल.
या बदलामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक अचूकपणे करता येणार असून, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कालका-साईनगर शिर्डी एक्सप्रेस आणि हावडा–साईनगर शिर्डी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या देशातील महत्त्वाच्या धार्मिक व व्यावसायिक मार्गांवर धावतात. त्यामुळे या वेळापत्रकातील बदलाचा परिणाम नियमित प्रवाशांबरोबरच शिर्डी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरही होणार आहे.
साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या या आगमन वेळेतील बदलामुळे स्थानकावरील गर्दी व्यवस्थापन आणि गाड्यांचे संचालन अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
