मंदिरात भयंकर प्रकार; 55 वर्षीय पुजाऱ्याचा डोक्यात वार करून खून
साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी :
शहरालगत असलेल्या झेडटीआरआय बोगद्याजवळील निर्जन परिसरातील मंदिरात 55 वर्षीय पुजाऱ्याची डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने भुसावळ शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
मृत पुजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय 55, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. आरपीडी रस्त्यावरील लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये ते पूजारी म्हणून कार्यरत होते. हा संपूर्ण परिसर निर्जन असल्याने येथे नागरिकांची वर्दळ अत्यंत कमी असते, अशी माहिती समोर आली आहे.
सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय मंदिरात गेले असता संतोष मंचल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. हा प्रकार पाहताच त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तसेच हवालदार संदीप पालवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला आणि महत्त्वाचे पुरावे संकलित केले.
दरम्यान, जळगाव येथून ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाचे सखोल वैज्ञानिक विश्लेषण सुरू आहे. हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
पोलिसांनी विविध शक्यतांचा विचार करून तपास सुरू केला असून परिसरातील माहिती, संशयित हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांची कसून पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
