साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील सुमारे ८ ते १० तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर ‘एटीएस’ (Anit-Terrorism Squad) आणि ‘एटीबी’ (Anti-Terrorism Branch) च्या पथकाने या सर्व तरुणांची कसून चौकशी केली असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होते संपर्कात; बँक खातीही रडारवर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या थेट संपर्कात आले होते. चौकशी करण्यात आलेल्या या संशयित तरुणांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या सर्व तरुणांच्या सोशल मीडिया खात्यांची (Social Media Accounts) कसून तपासणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा सुगावा लागल्याने यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांची (Bank Accounts) देखील सखोल चौकशी करण्यात आली आहे.
देशविघातक कृत्यांसाठी ‘स्लीपर सेल’ बनवण्याचा होता कट!
तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. गँगस्टर शहजाद भट्टी हा आपल्या हस्तकांच्या माध्यमातून या तरुणांशी संपर्क साधत होता. या स्थानिक तरुणांचा वापर करून देशात मोठी विघातक कृत्ये घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र ‘स्लीपर सेल’ (Sleeper Cell) तयार करण्याची मोठी शक्यता या तपासातून समोर आली आहे. हा कट वेळीच उधळल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
यंत्रणांनी अत्यंत गुप्तता पाळत या सर्व ८ ते १० तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. मात्र, त्यांचे वय आणि सोशल मीडियावरील दिशाभूल लक्षात घेता, या सर्व तरुणांचे योग्य पद्धतीने कौन्सिलिंग (समुपदेशन) करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या तरुणांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाने जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी आणि देशविघातक टोळ्यांचे जाळे किती खोलवर पसरत चालले आहे, या चिंतेने पालकांचे आणि प्रशासनाचे डोके चक्रावून सोडले आहे.
