साईमत न्यूज नेटवर्क –
जळगाव : जळगाव सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण नोंदवली गेली आहे. बाजार सुरू होताच १ तोळा सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे दर सलग चौथ्या दिवशी स्थिर राहिले. सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून खरेदीसाठी बाजारात चांगली गर्दी दिसून आली.
मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उताराचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या दरात तब्बल १,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात २,००० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर दोन दिवस दरात किरकोळ बदल होत असतानाच आज पुन्हा सोन्याचे भाव किंचित कमी झाले.
बुधवारी विनाजीएसटी १ तोळा सोन्याचा दर १ लाख ४१ हजार ८०० रुपयांवर पोहोचला होता. त्यात आज ३०० रुपयांची घट झाल्याने हा दर १ लाख ४१ हजार ५०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, १ किलो चांदीचा दर २ लाख २२ हजार रुपयांवर कायम असून गेल्या चार दिवसांपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही.
सध्या दागिन्यांच्या खरेदीत अपेक्षित वाढ दिसत नसली तरी सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांचा कल पुन्हा बाजाराकडे वळताना दिसत आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दरातील चढ-उतारावर ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
९ ते १६ जुलैदरम्यानचे सोन्याचे दर (प्रतिदहा ग्रॅम, विनादीएसटी)
९ जुलै – १,४३,५०० रुपये, १० जुलै – १,४३,००० रुपये, ११ जुलै – १,४३,००० रुपये, १२ जुलै – १,४२,००० रुपये,
१३ जुलै – १,४२,००० रुपये, १४ जुलै – १,४१,००० रुपये, १५ जुलै – १,४१,८०० रुपये, १६ जुलै – १,४१,५०० रुपये
९ ते १६ जुलैदरम्यानचे चांदीचे दर (प्रतिकिलो, विनादीएसटी)
९ जुलै – २,२७,००० रुपये, १० जुलै – २,२३,००० रुपये, ११ जुलै – २,२४,००० रुपये, १२ जुलै – २,२२,००० रुपये,
१३ जुलै – २,२२,००० रुपये, १४ जुलै – २,२२,००० रुपये, १५ जुलै – २,२२,००० रुपये, १६ जुलै – २,२२,००० रुपये
