८९ शस्त्रांचा साठा जप्त; अमेरिका–कॅनडा दरम्यान तस्करीचा प्रयत्न उधळला
साईमत / वृत्तसंस्था
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोलिसांनी शस्त्रास्त्र तस्करीच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करत ८९ शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एका पाकिस्तानी नागरिकासह तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यूएस अटर्नी ऑफिस फॉर सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्कच्या माहितीनुसार, न्यूयॉर्क स्टेट पोलिसांनी स्टेट रूट-९० वर एका वाहनाला थांबवून तपासणी केली. चौकशीदरम्यान संशयास्पद उत्तरे मिळाल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून काही शस्त्रे कारच्या मागील सीटवर लपवलेली होती.
या कारवाईत १७ चोरीच्या बंदुकांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी हे शस्त्र अमेरिकेतून कॅनडात तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये २२ वर्षीय मलिक ब्रॉमफील्ड (कॅनडा नागरिक), २५ वर्षीय फैजान अली (पाकिस्तान नागरिक) आणि २२ वर्षीय कमाल सलमान (कॅनडा, अमेरिका व जॉर्डन नागरिकत्व) यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान फैजान अलीकडे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जारी झालेला मुदतबाह्य पाकिस्तानी ड्रायव्हिंग परमिट आढळून आला. तिन्ही आरोपींवर बेकायदेशीर शस्त्र तस्करी, चोरीच्या शस्त्रांची वाहतूक, परवान्याशिवाय शस्त्र व्यवसाय आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोष सिद्ध झाल्यास आरोपींना ५ ते १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ही कारवाई न्यूयॉर्क स्टेट पोलीस, एफबीआय आणि एटीएफ यांच्या संयुक्त पथकाने केली असून, अशा प्रकारची तस्करी दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
