साईमत -जळगाव- प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध घातक शस्त्रे आणि अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एका संशयिताला गावठी पिस्तुलसह रंगेहात अटक केली आहे.
दिनांक १३ जून २०२६ रोजी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. पाचोरा तालुक्यातील सातगाव गावाबाहेर किशोर लक्ष्मण पाटील हा इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची ती माहिती होती.
माहिती मिळताच सपोनि कल्याणी वर्मा यांनी तात्काळ पोहेकॉ अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक विशेष पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले.
पोलिस पथकाने बातमीतील ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता, एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली, मात्र त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यातून तब्बल २०,००० रुपये किमतीची गावठी बनावटीची, मॅगझिनसह एक पिस्तुल हस्तगत करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किशोर लक्ष्मण पाटील (वय ३२, रा. सार्व पिंप्री, ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१४/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१),(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि विठ्ठल पवार करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (पाचोरा विभाग) बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोहेकॉ १४८९ अतुल पवार, पोहेकॉ १३४१ अभिजित निकम, पोना १३६६ राहुल बेहेरे, पोकॉ २४४४ अमोल पाटील, पोकॉ २४१० प्रमोद वाडीले आणि पोकॉ ६१० नामदेव इंगळे (सर्व नेमणूक पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
