महू फुलांची वाईनही द्राक्ष वाईनप्रमाणे ब्रँड बनू शकेल

0
4

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव,सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आढळणारा, आणि कल्पवृक्ष म्हणुन सुपरिचित असलेल्या महु झाडाच्या फुलांपासून बनणारी दारू ही अवैध, गावठी प्रकारातील म्हणुन ओळखली जाते. ही दारू पाडणारे आदिवासी कुटुंब आणि पिणारे दोघांनाही लपुनछपून व्यवहार करावा लागतो. पण औषधी गुणधर्म असलेल्या महु फुलांपासून शास्रशुध्द पध्दतीने वाईन बनवली गेली तर नाशिकच्या द्राक्ष वाईनप्रमाणे महु फुलांच्या वाईनचा देखील एक मोठा ब्रँड तयार होईल. जर कुणी असा प्रकल्प करण्यास पुढे येत असेल तर फ्रुट वाईनच्या धतीॅवर जिल्हाधिकारी म्हणुन परवानगी देण्यास मी तयार आहे, अशी माहिती आयुष प्रसाद यांनी ‘साईमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ज्या गोष्टीला अधिकृत म्हणुन मान्यता मिळु शकते, ती अनधिकृत म्हणुन का करावी? कोणतीही अनधिकृत गोष्ट ही धोकादायक असते. महु फुलांची दारू म्हटली की, आदिवासी किंवा दारू पाडणारे लोक नदी आडोश्याला, घाणरड्या ठिकाणी जाऊन दारू पाडतात. साप, विंचु दंशाने काहींचा मृत्यू देखील झाला आहे. विशेष म्हणजे त्यांची पध्दत देखील चुकीची असू शकते. जे लोक या दारूचे सेव्हन करतात, त्यांच्या जीवाला देखील धोका असतो. त्यामुळे सातपुड्याच्या पर्वतराजीत निसर्गाने निर्माण केलेले महु या झाडाच्या फुलांचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. त्यामुळे या फुलांच्या विक्रीतुन अनेक आदिवासींना रोजगार मिळतो. याच फुलांचा उपयोग करून आदिवासी लोक दारू पाडतात. या दारूला अनेक लोकांची पसंती देखील मिळते. गोव्यात काजु फेणी, नाशकात द्राक्ष वाईन तयार होत असेल तर सातपुड्याचा मोठा भाग असलेल्या जळगाव जिल्ह्यात महु फुलांच्या वाईनचा प्रकल्प निर्माण केला जाऊ शकतो. फ्रुट वाईनच्या धर्तीवर परवागी देता येईल. आज सुला वाईनमुळे मोठा उद्योग समूह नाशकात उभा राहिला आहे, तसा प्रयोग जळगावात यशस्वी होऊ शकतो.

वाळु माफियांचा बंदोबस्त होईल
वाळु माफियांबाबत जळगावच्या प्रसारमाध्यमांमधून खुप लिहून येते. त्यामुळे हा बंदोबस्त कसा करता येईल, याचा विचार मी केला. जळगावाला जेवढ्या वाळुची गरज आहे, ते पहाता आज जे वाळु उपश्याचे ठेके देता येणे शक्य आहे, तेवढे दिले गेलेले नाही. अनधिकृत व्यवसाय अधिकृत केला तर जळगावकरांना अत्यंत माफक दरात वाळु उपलब्ध होईल. त्यामुळे या अनधिकृत व्यवसायात कुणीच दिसणार नाही. सध्या कारवाई करून बंदोबस्त करण्यात येत आहे. सहा महिन्याच्या आत कायमचा बंदोबस्त करणार आहे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

शुन्य देणारे जळगाव विश्व निर्माण करू शकते
जळगावने जगाला शुन्य दिला आहे. त्यामुळे ते विश्व निर्माण करू शकते. जळगावमध्ये सर्वाधिक शेती ही सिंचनावर केली जाते. वीज निर्मितीचे केंद्र आहे. केळीचे आगार आहे. सुवर्णाची मोठी बाजार पेठ आहे. महामार्ग आहे. रेल्वे आहे, विमानसेवाही आहे. तापीच्या माध्यमातुन पाणी आहे. पाणीपुरवठा आहे. औद्योगिक वसाहत आहे. नवीन आणि वाढीव औद्योगिक वसाहती अमळनेर, चोपडा, रावेर येथे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जळगावकरांमध्ये मी उद्योजक होणार ही भावना तयार होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here