नाशिकचा तिढा सुटला, पण जळगावात पेच कायम; संकटमोचक गिरीश महाजनांच्या रणनीतीला खिळ?
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा अत्यंत कौशल्याने सोडवल्यानंतर महायुतीचे नेते सुटकेचा श्वास सोडत नाहीत, तोच जळगावातून मोठी राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. जळगावमधील शिवसेना (शिंदे गट) बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढवली असून, आज त्यांच्या बंडखोरीवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता असतानाच त्या अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्या आहेत. सकाळपासूनच त्यांचा कोणाशीही संपर्क होत नसल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र, पण…
नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात यश आल्यानंतर महायुतीचे संकटमोचक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन हे तातडीने जळगावात दाखल झाले होते. जळगावमधील बंडखोरी मोडून काढण्यासाठी त्यांनी काल रात्री उशिरापर्यंत स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र चालवले. या मॅरेथॉन बैठकांमध्ये रेश्मा काळे यांची बंडखोरी कशी मागे घ्यायची, त्यांना कोणते पर्याय द्यायचे, याबाबतची संपूर्ण रणनीती आखण्यात आली होती. आज (शुक्रवारी) त्यांच्याशी थेट समोरासमोर चर्चा करून हा तिढा कायमचा मिटवला जाईल, अशी खात्री महायुतीच्या नेत्यांना होती.
फोन बंद, नेते चिंतेत!
महायुतीचे बडे नेते आज सकाळी तोडग्यासाठी रेश्मा काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांनी ‘नॉट रिचेबल’ होत नेत्यांना मोठा धक्का दिला. सकाळपासूनच त्यांचा मोबाईल फोन बंद येत असून त्या सध्या नेमक्या कुठे आहेत आणि कोणाच्या संपर्कात आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. ऐन तोडग्याच्या दिवशीच त्यांनी घेतलेल्या या गूढ पवित्र्यामुळे महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
राजकीय गणिते बिघडणार?
रेश्मा काळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी पुन्हा एकदा उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. त्यांनी वरिष्ठ नेत्यांना चकवा दिल्यामुळे जळगावातील ही बंडखोरी शमणार की महायुतीचे अधिकृत उमेदवाराचे गणित बिघडणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपूर्वी रेश्मा काळे यांचा संपर्क होतो की जळगावात एखादा मोठा राजकीय भूकंप होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज दिवसभरात जळगावात अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
