बिल दुरुस्त करण्याऐवजी ‘हप्त्यांमध्ये पैसे भरा’चा सल्ला सौरऊर्जा ग्राहकांनाही चुकीच्या बिलांचा फटका
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
महावितरणच्या ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे सामान्य ग्राहकांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याची गंभीर बाब जळगाव शहरात पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरातील सम्राट कॉलनीतील एका ग्राहकाला अवघ्या ३० दिवसांच्या कालावधीसाठी तब्बल ७५ हजार ९०० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्राहकाने तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात धाव घेतल्यानंतरही बिल तपासून दुरुस्त करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी ‘हप्त्यांमध्ये पैसे भरा’ असा अजब सल्ला दिल्याने संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनीतील रहिवासी सुशीलाबाई श्रीश्रीमाळ यांना मे ते जून या ३० दिवसांच्या कालावधीसाठी ३ हजार ६७६ युनिट वीज वापर दाखविण्यात आला. त्यानुसार त्यांना ७५ हजार ९०० रुपयांचे अव्वाच्या सव्वा बिल पाठविण्यात आले. सामान्य घरगुती ग्राहकासाठी इतका प्रचंड वीज वापर शक्य नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
याबाबत सुशीलाबाई यांचे कुटुंबीय प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी तीव्र संताप व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज वापरणारी कोणतीही औद्योगिक किंवा मोठी उपकरणे नाहीत. तरीही हजारो युनिटचा वापर दाखवून इतके मोठे बिल पाठविण्यात आले आहे. हा सरळसरळ महावितरणचा मनमानी कारभार असून एवढा वीज वापर झाला नसताना हे युनिट आले कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
श्रीश्रीमाळ यांनी बिलाबाबत दाद मागण्यासाठी महावितरण कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी बिलाची तपासणी करून दुरुस्ती करण्याऐवजी रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याचा सल्ला दिला. या उत्तरामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मीटर रीडिंग घेण्यातील चुका, तांत्रिक बिघाड किंवा बिलिंग प्रक्रियेतील त्रुटींमुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, महावितरणच्या चुकीच्या बिलिंगचा फटका आता सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांनाही बसत असल्याची बाब समोर आली आहे. शहरातील पटेल नगर येथील सौरऊर्जा ग्राहक सुरेश जैन यांनी जून महिन्याच्या बिलावर तीव्र हरकत घेतली आहे. नियमानुसार सौरऊर्जेच्या माध्यमातून महावितरणला दिलेल्या विजेची (एक्सपोर्ट युनिट) स्वतंत्र नोंद होणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने ही वीज स्वतंत्र न दाखवता ग्राहकाने घरात वापरलेल्या विजेमध्येच (इम्पोर्ट युनिट) समाविष्ट केली. त्यामुळे जादा बिल आकारण्यात आल्याचा आरोप जैन यांनी केला आहे.
संबंधित बिलाची तातडीने दुरुस्ती करून जादा आकारलेली रक्कम परत करावी किंवा पुढील बिलात समायोजित करावी, अशी मागणी सुरेश जैन यांनी केली आहे.
महावितरणच्या वाढत्या चुकीच्या बिलांमुळे जळगावकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून ग्राहकांना दिलासा द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
