साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
येथील नामांकित श्री महावीर सहकारी बँक लि.च्या उपाध्यक्षपदी स्वरूपकुमार भागचंद लुंकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवी पेठ येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष दलिचंद जैन यांच्यासह सर्व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वरूपकुमार लुंकड यांनी संचालक मंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “बँकेत संचालक म्हणून काम करत असताना मिळालेली ही नवीन जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. संचालक मंडळाचा हा विश्वास मी सदैव सार्थ ठरवेन. बँकेची अविरत प्रगती, ठेवीदार व सभासदांचे हित जोपासणे आणि संस्थेची गौरवशाली परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कटिबद्ध राहीन.”
या महत्त्वपूर्ण बैठकीला बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष लोढा, अशोक खिवसरा, भास्कर कोळी, रविंद्र गुजराथी, गुणवंत टोंगळे, जितेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया तसेच संचालिका कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर, रंजना देशमुख आणि आर. जे. पवार उपस्थित होते. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनोहर पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नवनियुक्त उपाध्यक्षांवर सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
