खोकरपाट शाळेतील विद्यार्थ्यांचा नाटकातील सहभागाबद्दल गौरव

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

एखाद्या विषयाची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती कशी करता येईल, यासाठी विविध नाटिका, नाट्यछटा, गीते तसेच विविध अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी तालुक्यातील खोकरपाट येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त गुणांनाही वाव मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासही होत आहे. अशातच शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘संत तुकाराम’ नाटक सादर करुन मने जिंकली आहेत. याबद्दल नाटकातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. तसेच नाटकातील उत्कृष्ट पात्र साकारणाऱ्या चिमुकल्या कलाकार विद्यार्थ्यांना शिवशाही फाउंडेशनतर्फे बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी बडगुजर होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीडीएफचे कार्याध्यक्ष उमेश काटे, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दीपककुमार पाटील, भैय्यासाहेब साळुंखे, महेंद्र पाटील उपस्थित होते.

दुष्काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा जगातील पहिला संत म्हणजे संत तुकाराम महाराज होते. ही अलौकिक घटना विद्यार्थ्यांना समजावी तसेच संत तुकाराम महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत काय कार्य करत होते? त्याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ‘संत तुकाराम’ नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पटवून दिले आहे. ‘जे का रंजले गांजले..त्यासी म्हणी जो आपुले… तोचि साधू ओळखावा… देव तेथेची जाणावा’ या संत तुकाराम महाराजांच्या देवत्वाची व साधत्वाची नवीन व्याख्या विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दाखवून दिली. नाटकात प्रणव जयवीर पाटील या विद्यार्थ्याने संत तुकारामांची भूमिका साकारली. कार्तिकी हेमराज पाटील हिने कान्होबा तर अक्षदा मुकेश पाटील, दर्शना समाधान पाटील, अभिषेक सुनील सोनवणे, गायत्री संदीप माळची यांनी भाविकाची भूमिका बजावली.

यावेळी मुख्याध्यापिका रोहिणी बडगुजर यांनी शाळेतील माझे प्रयोगालय, संतवाणी, भाकरीचा चंद्र, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचे विशेष शिकवणी वर्ग यासह विविध उपक्रमाविषयीची माहिती दिली. यावेळी उमेश काटे आणि दीपककुमार पाटील यांनी शाळेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक भैय्यासाहेब साळुंखे तर महेंद्र पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here