साईमत लाईव्ह विजय चौधरी सोयगाव तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील गोद्री – पळासखेडा शिवारातील वनविभागाच्या जागेत रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभाग जळगाव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे मोजमाप करून 5 किलोमीटर लांब आणि 24 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी सीमांकाम करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार ( दि.18 ) रोजी वनविभागाच्या जागेत रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभागाने अंतिम परवानगी दिल्याने तातडीने रस्त्याच्या सीमा निश्चित करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
सदरील रस्त्याच्या सीमा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने याठिकाणी रस्ता करण्याच्या कामाला आता वेग येणार आहे. गतिमान पध्दतीने हा रस्ता करण्यात यावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने या भागातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देवून रस्त्याचा सीमा निश्चित केल्या. यावेळी फर्दापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय टाकसाळ, शाखा अभियंता नितीन राठोड, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता जी. आर. पाटील, अभियंता श्री. चोपडे, श्री. चंडोल, शासकीय कंत्राटदार अशोक चव्हाण, जळगाव येथील सहाय्यक वनरक्षक उमेश गिरजधार, जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनसर्वेक्षक ए. बी. चव्हाण, गोद्री येथील वनपाल सी.बी. महाजन आदींची उपस्थिती होती.