साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
येथील बियाणी मिलिटरी स्कुल येथे भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे रविवारी, १४ जानेवारी रोजी जिल्हा संघ निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात शालेय जिल्हास्तरीय गोळा फेक (शॉट पुट) स्पर्धेत जळगाव येथील के.सी. ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील सहावीचा विद्यार्थी अजिंक्य पंकज सोनार याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. येत्या ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सांगली येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा होत आहे. यासाठी तो राज्यस्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
अजिंक्यला के.सी.ई. सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षणासाठी त्याला ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक-ॲथलेटिक्स तुषार पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल त्याचे मित्र परिवार, पालक आणि शाळेतून कौतुक होत आहे.