आदिवासी दुर्गम भागात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी ‘सीईओ’ थेट नागरिकांच्या दारात.
जळगाव -प्रतिनिधी -भारती सवर्णे |
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी शुक्रवार, १९ जून रोजी रावेर तालुक्यातील ‘पेसा’ (PESA) अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांची अचानक व सविस्तर पाहणी केली. विशेष म्हणजे, आदिवासी आणि दुर्गम भागात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी भेट देऊन थेट नागरिकांशी संवाद साधल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
”आदिवासी पेसा क्षेत्रातील एकही नागरिक सुविधांपासून वंचित राहता कामा नये आणि सर्व विकासकामे दर्जेदारच झाली पाहिजेत,” अशा कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. रात्रीच्या वेळी त्यांनी थेट ‘चावडी बैठक’ घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
पंचायत समिती आवाराची पाहणी आणि दुरुस्तीचे आदेश
दौऱ्याची सुरुवात करत करिश्मा नायर यांनी रावेर पंचायत समितीच्या आवारातील मेस, महिला व पुरुषांची स्वच्छतागृहे (टॉयलेट) आदी सुविधांची बारकाईने पाहणी केली. या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती व स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, आवारात सुरू असलेल्या सभागृह व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन बांधकामांची पाहणी करून कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना केल्या.
ग्रामपंचायतींना भेटी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती
रावेर तालुक्यातील कुसुंबे खुर्द, पाल, सहस्त्रलिंग व खिरोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयांना भेट देऊन त्यांनी ‘व्ही.बी.रामजी ६’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व नोंदी पूर्ण करून कामकाज अधिक पारदर्शक व प्रभावीपणे करावे, असे त्यांनी बजावले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही घरकुल लाभार्थ्यांच्या थेट घरी जाऊन सुरू असलेल्या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “अपूर्ण घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा,” असे आवाहन करत त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणेला लाभार्थ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले.
ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या शाळा खोली बांधकाम आणि भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्राच्या कामांची प्रगती व नियोजन त्यांनी तपासले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी शिक्षण व बांधकाम विभागाला मार्गदर्शन केले. तसेच, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देण्यावर भर देण्यास सांगितले.
दौऱ्यादरम्यान रात्र झाली असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी खिरोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आरोग्य केंद्रांतर्गत येणारी गावे आणि मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी वैद्यकीय पथकाला दिले.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात सीईओ करिश्मा नायर यांच्यासोबत खालील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते:
प्रशासकीय अधिकारी: रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) विनोद मेढे, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता योगेश इंगळे, सहाय्यक अभियंता कोमलसिंग राजपूत, तालुका पेसा व्यवस्थापक युनुस तडवी, आणि घरकुल विभागाचे आरएचई धीरज धनगर.
ग्रामपंचायत अधिकारी: रुबियाना (कुसुंबे खु.), राजेंद्र तडवी (सहस्त्रलिंग), सुनील सवर्णे (पाल).
स्थानिक लोकप्रतिनिधी: सरपंच मुबारक तडवी (कुसुंबे खु.), सौ. अकिला युनुस तडवी (सहस्त्रलिंग), सौ. हाजरा कामील तडवी (पाल) यांच्यासह तीनही गावांचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
