साईमत -भुसावळ – प्रतिनिधी |
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तब्बल दोन वर्षे वारंवार अत्याचार केल्याची आणि तिची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना भुसावळ येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह तिघांविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयिताने २०२३ पासून जुलै २०२५ या कालावधीत पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या काळात संशयिताने तिच्याकडून मोठी रक्कम आणि एक मोटारसायकलही उकळली. अखेर संशयिताने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. या संपूर्ण प्रकारात मुख्य संशयिताला सहकार्य केल्याचा आरोप इतर दोन साथीदारांवर आहे.आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडित तरुणीने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे. कायद्यानुसार पीडित तरुणीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
