जळगावहून मोठ्या विमानांची सेवा… धावपट्टी विस्ताराचा मार्ग मोकळा; जमिनींच्या मोजणीला गती
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव विमानतळावरून अधिक शहरांसाठी आणि मोठ्या विमानांची उड्डाणसेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीचा (Runway) विस्तार अत्यंत आवश्यक बनला आहे. या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला गती देऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. विमानतळ विकास, विस्तारीकरण, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सध्या जळगाव विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. इतर शहरांशी जोडणी वाढवण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करणे गरजेचे आहे. या विस्तारीकरणासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका दर्शवली असून, जमीन मोजणीच्या कामात कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
प्रकल्पग्रस्तांना वेळेत मदत व शेतजमिनींसाठी स्वतंत्र मार्ग
विस्तारीकरणासाठी संपादित होणाऱ्या जमिनींमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मिळणारी आर्थिक मदत व इतर लाभ वेळेत उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, विमानतळाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या शेतजमिनींवर शेतकऱ्यांना ये-जा करताना अडचण येऊ नये म्हणून १० फूट रुंदीचा स्वतंत्र प्रवेशमार्ग (अॅक्सेस रोड) उपलब्ध करून दिला जाणार आहे.
५ कोटींचे सौर पथदिवे आणि ६.५० कोटींचे रस्ते मंजूर
विमानतळ मार्गाची सुरक्षितता व सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी अजिंठा चौफुली ते विमानतळापर्यंत सौर पथदिवे (Solar Street Lights) बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय, परिसरातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी ६ कोटी ६० लाख रुपयांच्या रस्ते विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये:
परिमा क्रमांक १०९ वरील ५ किमी रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण.
चिंचोली–नशिराबाद–उमाळा कच्च्या वहिवाट रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम.
धावपट्टीचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर जळगावमधून मोठ्या विमानांची वाहतूक सुलभ होईल आणि भविष्यातील विमानसेवेच्या विस्ताराला मोठी चालना मिळेल.
