साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरातील ‘नोबल मार्केटिंग अँड मिडिया सोल्युशन’ (यादव कॉर्नर) येथून तब्बल ५२ हजार ८०० रुपये किमतीच्या यंत्रसामग्रीची चोरी करणाऱ्या चोरट्याला शनीपेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी संशयिताकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
३ ऑगस्ट रोजी नोबल मार्केटिंगच्या दुकानातून ३ वेल्डिंग मशीन आणि १६ ग्राइंडर मशीनचे बॉक्स चोरीला गेले होते. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जायवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने (DB Team) तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान डीबी पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. तसेच गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रिय केले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी एमआयडीसी परिसरातील एका मंदिरा जवळ थांबल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या ३ वेल्डिंग मशीन आणि १६ ग्राइंडर मशीन असा एकूण ५२,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही धडक कामगिरी बजावली. अवघ्या २४ तासांत चोरीचा छडा लावून मुद्देमाल रिकव्हर केल्याबद्दल शनीपेठ पोलिसांचे शहरात कौतुक होत आहे.
