साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात ‘ड्रॉप केस’च्या माध्यमातून देशभर फसवणुकीचे जाळे विणणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांवर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज १९ जून रोजी पहाटे, २००
पोलिसांच्या फौजेने मुक्ताईनगरमधील ५ गावांवर एकाच वेळी धडक टाकत “ऑपरेशन ड्रॉप केस” फत्ते केले. या कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
‘काळ्या हळदी’पासून ‘नागमणी’पर्यंत… अशी व्हायची ‘लूटमार’!
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या कमी लोकसंख्येच्या गावांना गुन्हेगारांनी आपले केंद्र बनवले होते.
भूलथापांचे आमिष: सोशल मीडियाच्या माध्यमातून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सुलेमानी पत्थर, दुर्मिळ शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे बनावट व्हिडिओ व्हायरल करून देशभरातील श्रीमंतांना आकर्षित केले जायचे.
ट्रॅप आणि मारहाण: ग्राहकाला गावात बोलावून बनावट वस्तू किंवा खोट्या नोटा दाखवून लुटले जायचे. नकार दिल्यास थेट जीवघेणी मारहाण करून पैसे हिसकावले जायचे.
ब्लॅकमेलिंगचा थरार: पीडित व्यक्तीने पोलिसात जाऊ नये म्हणून त्याच्याजवळ बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून व्हिडिओ बनवला जायचा आणि “वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू”, अशी धमकी दिली जायची.
३ वर्षांतील गुन्हेगारीचा आलेख: या परिसरात गेल्या ३ वर्षांत दरोड्याचे १०, जबरी चोरीचे ७ आणि फसवणुकीचे १६ गंभीर गुन्हे दाखल झाले होते.
पहाटेचा थरार: पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन आणि अटक आरोपी
उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रशांत दरेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पो.नि. राहुल गायकवाड यांच्यासह २०० पोलिसांच्या पथकाने पहाटे अंधारातच गावांला वेढा घातला. या छाप्यात खालील अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या:
जप्त शस्त्रे आणि रोख रकमेसह अटकेतील आरोपी:
फरेज राजु पवार (वय ४०, रा. मधापुरी): १० हजार रुपये किमतीचे लोखंडी रिव्हॉल्व्हर व जिवंत कारतूस जप्त.
रमजाने राईसाहेब भोसले (वय ३२, रा. हलखेडा): गावठी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’च्या १०० च्या नोटांचे २ बंडल जप्त.
आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२, रा. हलखेडा): ६४ हजार ५०० रुपयांची रोख, १७ मोबाईल (किंमत १.१० लाख) आणि ३६ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त.
रोहित सुदेश पवार (वय ३२, रा. मधापुरी): १४ लाख रुपयांची रोख आणि २ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त.
गांझी दरियासिंग भोसले (रा. हलखेडा जुने): वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार अटक. (१ हरणाचे, १ कोल्ह्याचे आणि १ सशाचे कातडे जप्त).
फरारी आरोपींना बेड्या: पूर्वीच्या गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड आरोपी विलास नरबिलाल पवार आणि अजय दादा पवार (दोघे रा. हलखेडा) यांनाही पोलिसांनी जेरबंद केले.
तसेच हलखेडा येथील राजकिसन भोसले, दया भोसले, शिवकिसन भोसले, आक्काबाई भोसले आणि जोगिंदर भोसले यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या धडक मोहिमेत पोलिसांनी गुन्हेगारांकडून कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:मुद्देमालतपशील / वजनअंदाजे किंमतरोख रक्कमकपाटांमधून जप्त२० लाख रुपयेसोन्याचे दागिने३०० ग्रॅम३० लाख रुपयेचांदीचे दागिने४ किलो०८ लाख रुपयेघातक शस्त्रे२ गावठी कट्टे, ३ जिवंत कारतुसे
वाहने४ चारचाकी, ६ दुचाकी–मोबाईल३० स्मार्टफोन–वन्यजीव अवशेषहरिण, कोल्हा व सशाचे कातडे–जळगाव पोलिसांच्या या धडक आणि धाडसी कारवाईमुळे मुक्ताईनगर परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.
