साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
फरार आरोपींचा बंदोबस्त आणि अवैध शस्त्रनिर्मितीच्या मुळावर घाव घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातील गुन्हेगारांच्या सुरक्षित आश्रयस्थानावर धडक कारवाई केली आहे. जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे पहाटेच्या सुमारास ‘ऑपरेशन कॉम्बिंग सर्च’ राबवून अवैध शस्त्रास्त्रांचा मोठा साठा, दारूगोळा आणि ३२ संशयित वाहने जप्त केली आहेत.
पहाटे ४ वाजता ४०० पोलिसांचा वेढा
चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिकच्या पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यांतील संशयित पार उमरटी परिसरात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगाव पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा २० शासकीय वाहनांसह मध्यरात्रीच रवाना झाला. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत संपूर्ण गावाला वेढा घालून अत्यंत गुप्तपणे ही शोधमोहीम राबवण्यात आली.
कारवाईचा ताळेबंद
१२ संशयित ताब्यात : कारवाईदरम्यान ४५ घरांची झाडाझडती घेण्यात आली. २० संशयितांची जागेवरच चौकशी करून १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
देशी कट्टे व काडतुसे : चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासात २ देशी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे हस्तगत.
३२ वाहने जप्त : संशयास्पद स्थितीत आढळलेल्या ३२ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.
कारखाना उद्ध्वस्त : देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि साचे जप्त करून अवैध शस्त्रनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला.
२७ फरारांच्या घरांचे जिओ-टॅगिंग!
केवळ गुन्हेगारांना पकडून पोलीस थांबले नाहीत, तर भविष्यात त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. या कारवाईदरम्यान फरार आणि संशयित अशा २७ आरोपींच्या घरांचे ‘जिओ-टॅगिंग’ करण्यात आले आहे. आता तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर २४ तास पोलिसांची नजर असणार आहे.
