रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा हैदोस; पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी |
नशिराबाद शहरातील खालची आळी येथील विठ्ठल मंदिर परिसरापासून ते वरच्या वाड्यापर्यंतच्या भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरी, स्पेअर पार्टची चोरी तसेच वाहनांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अज्ञात चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी सातत्याने अशा घटना घडत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये कमालीचे भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांच्या शांततेनंतर टोळी पुन्हा सक्रिय?
काही महिन्यांपूर्वी या परिसरात अशा प्रकारच्या चोऱ्यांच्या घटनांनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईमुळे काही काळ या घटनांना आळा बसल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून, पेट्रोल चोरीसोबतच गाड्यांचे महागडे स्पेअर पार्ट काढून नेणे आणि वाहनांचे नुकसान करण्याचे सत्र सुरू केले आहे.
सकाळी उठल्यावर बसतोय ‘आर्थिक फटका’
नागरिक रात्री आपली वाहने घराबाहेर किंवा गल्लीत पार्क करतात. मात्र, सकाळी जेव्हा ते कामावर जाण्यासाठी वाहन काढतात, तेव्हा पेट्रोल चोरी झाल्याचे किंवा वाहनाचे महत्त्वाचे भाग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना नाहक मानसिक त्रासासोबतच मोठ्या आर्थिक फटक्यालाही सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला आहे.
या चोऱ्यांच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत नशिराबाद पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून या अज्ञात चोरट्यांचा माग काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच विठ्ठल मंदिर ते वरचा वाडा या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक तीव्र करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची वाट न पाहता सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहनधारकांनी आपली वाहने शक्यतो सुरक्षित किंवा उजेड असलेल्या ठिकाणी उभी करावीत, असे आवाहन सुजाण नागरिकांकडून केले जात आहे. तसेच, परिसरात रात्रीच्या वेळी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नशिराबाद पोलिसांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
