ग्रीन सिटी फाउंडेशन आणि मनपा पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र
साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
शहरातील वाढत्या तापमानाचा पारा नियंत्रित करण्यासाठी आणि जळगावला पर्यावरण पूरक बनवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ने कंबर कसली आहे. जळगाव शहराचे तापमान कमी करणे आणि पर्यावरण संवर्धन करणे या दृष्टीने महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या कक्षात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये आगामी ५ वर्षांचा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
२०२६ ते २०३० चा कृती आराखडा; शाळा-महाविद्यालयांवर फोकस
’ग्रीन सिटी फाउंडेशन’ने सन २०२६ ते २०३० या आगामी पाच वर्षांच्या कालावधीत जळगावचे तापमान लक्षणीयरीत्या कमी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या मोहिमेला महानगरपालिका पूर्ण ताकदीने सहकार्य करणार आहे. या उपक्रमांतर्गत केवळ रस्त्यांच्या दुतर्फा नव्हे, तर शहरातील विविध शासकीय-निमशासकीय जागा, मैदाने आणि विशेषतः शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे. तरुण पिढीलाही या मोहिमेत जोडून घेण्याचा मनपाचा मानस आहे.
केवळ वृक्षारोपण नाही, संवर्धनावर असणार भर
या बैठकीत केवळ झाडे लावण्यावर नव्हे, तर ती जगवण्यावर सविस्तर चर्चा झाली. वृक्षारोपणाचे काम हे केवळ नावापुरते किंवा कागदावर न राहता, लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन आणि संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मनपा आणि फाउंडेशन मिळून एक कडक मॉनिटरिंग सिस्टीम तयार करत आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील यांच्यासह ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’चे विजयकुमार वाणी आणि डॉ. धनंजय बेंद्रे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. जळगावला हिरवेगार आणि थंड ठेवण्याच्या या मोहिमेत नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
केवळ नावापुरते वृक्षारोपण नको, संवर्धन महत्त्वाचे!
“वृक्षारोपणाचे काम हे केवळ नावापुरते न राहता संवर्धनाच्या दृष्टीने झाले पाहिजे. यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करत आहोत. पुढील चार महिन्यांत शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध वृक्षारोपण केले जाईल, जेणेकरून भविष्यात जळगावचे तापमान कमी होण्यास मोठी मदत होईल.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव
