साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटून गेला तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे खरिपाची पेरणी पूर्णपणे रखडली असून, जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटाच्या छायेत सापडला आहे. पावसाअभावी शेतकर्यांच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासूनच शेताची मशागत, नांगरणी आणि कुळवणी करून ठेवली होती. २५ मे रोजी रोहिणी तर ७ जून रोजी मृग नक्षत्राची सुरुवात झाली. मात्र, पारंपरिकरीत्या पेरणीचा काळ मानल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांची पूर्ण निराशा केली.
आता २२ जूनपासून ‘आद्रा’ नक्षत्राला सुरुवात होत असून, या काळात तरी वरुणराजा बरसेल का? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. जर पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे बागायती शेतकऱ्यांचा आधार असला, तरी कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
धरणामधील पाणी पिण्यासाठी राखीव!
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई भीषण झाली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने धरणामधील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेतीसाठी अतिरिक्त आवर्तने सोडली जाणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर केवळ पावसाचाच एकमेव पर्याय उरला आहे.
’पेरणी करावी की आणखी थांबावे?’ शेतकऱ्यांसमोर मोठा संभ्रम
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोअरवेलची सोय आहे, त्यांनी कसाबसा पेरणीचा श्रीगणेशा केला आहे. परंतु, पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर “पेरणी करावी की आणखी थांबावे?” असा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
