साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या एका जागेसाठी आज सकाळपासूनच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, मतदानाला कमालीच्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या हायव्होल्टेज लढतीकडे लागले आहे.
या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यंदाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांमध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला अशी समसमान संख्या आहे. त्यामुळे महिला मतदारांची भूमिका या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याचे दिसते.
’बॅलेट पेपर’चा नवा ट्रेंड; तरुण नगरसेवकांचा उत्साह
जळगाव तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रथमच निवडून आलेल्या अनेक तरुण नगरसेवकांनी आयुष्यात पहिल्यांदाच ‘बॅलेट पेपर’द्वारे (मतपत्रिका) मतदान करण्याचा अनुभव घेतला. पहिल्यांदाच अशा पद्धतीने मतदान करण्याची संधी मिळाल्याने नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंद दिसून आला. नगरसेवक अरविंद देशमुख, दीपक सूर्यवंशी, वीरेंद्र खडके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी सकाळच्या सत्रातच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनीही मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली, तर बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी थेट महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता ही लढत नंदकिशोर महाजन (महायुती) विरुद्ध शरद तायडे (महाविकास आघाडी) अशी सरळ आणि ‘कांटे की टक्कर’ बनली आहे.
ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांपूरती मर्यादित नसून जिल्ह्यातील राजकीय सत्तेचे वर्चस्व सिद्ध करणारी ठरत आहे.
महायुतीकडून: मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे.
महाविकास आघाडीकडून: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे.
बंडखोरांची माघार, दिग्गजांनी लावलेली ताकद आणि तरुण मतदारांचा उत्साह यामुळे जळगाव विधान परिषदेची ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात मतदान शांततेत सुरू असले तरी पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता या सत्तेच्या सारीपाटावर जळगावचा ‘नवा कारभारी’ कोण ठरणार, याचा फैसला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
