साईमत / जळगांव
एप्रिल महिन्याची सुरुवात साधारणतः कडक उन्हाने होत असते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळत असून जळगावसह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनियमित पावसाचे सत्र सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी चिंता अधिक वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून 3 आणि 4 एप्रिलसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार पावसासह ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच शेतीपिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात वारंवार ऑरेंज अलर्ट देण्याची वेळ आल्याने हवामानातील बदल किती तीव्र झाला आहे, हे स्पष्ट होत आहे. 1 एप्रिल रोजी सुरुवातीला यलो अलर्ट देण्यात आला होता, मात्र परिस्थिती गंभीर होताच तो ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असून गहू, हरभरा आणि कांदा यांसारखी पिके शेतात तयार अवस्थेत आहेत. अशा वेळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. विशेषतः केळी उत्पादक पट्ट्यातील शेतकरी अधिक चिंतेत आहेत.
हवामानात बदल जाणवला
अलीकडच्या काळात उष्णतेची तीव्रता जाणवत असताना पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान 35.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंशांच्या आसपास नोंदवले गेले. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी हवामानातील हा अचानक बदल भविष्यातील संकटांची चाहूल ठरत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
