शेतकऱ्यांचे सिबिल तपासून ₹१५० शुल्क आकारल्याचा आरोप; बँक आवारात स्व. अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची चेअरमन संजय पवारांची घोषणा
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज बँकेच्या आवारात पार पडली. या सभेत शेतकऱ्यांचे तपासले जाणारे ‘सिबिल’, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, बँकेतील भंगार विक्री आणि वसंत सहकारी साखर कारखान्याची विक्री या मुद्द्यांवरून सभासदांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याने सभा अत्यंत वादळी ठरली.
’सिबिल’ तपासणीवरून सभासद आक्रमक; ₹१५० शुल्कावर प्रश्नचिन्ह
सभेच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला. “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सिबिल तपासले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही, जिल्हा बँक मात्र शेतकऱ्यांचे सिबिल तपासून त्यासाठी तब्बल १५० रुपये शुल्क वसूल करत आहे,” असा गंभीर आरोप सभासदांनी केला. यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला.
चेअरमन संजय पवारांचा खुलासा
सभासदांच्या या आरोपाला उत्तर देताना बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले, “शेतकऱ्यांचे सिबिल तपासू नये, असा कोणताही अधिकृत अथवा लेखी शासन निर्णय (GR) जिल्हा बँकेला अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नियमानुसार ही प्रक्रिया सुरू आहे.”
वसंत साखर कारखाना विक्रीला तीव्र विरोध
सभेत ‘वसंत सहकारी साखर कारखाना’ विक्रीच्या मुद्द्यावर सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवला. कारखाना विक्री करू नये, अशी जोरदार मागणी सभासदांकडून करण्यात आली.
यावर स्पष्टीकरण देताना चेअरमन संजय पवार यांनी सांगितले की, “हा कारखाना कोणत्याही बाहेरच्या घटकाला न देता स्थानिक उद्योगपतीलाच विकला जाईल. एवढेच नव्हे तर तेथे साखर कारखान्याव्यतिरिक्त अन्य कोणताही उद्योग सुरू करता येणार नाही, अशी कडक अट करारात घातली जाणार आहे.”
बँकेच्या आवारात स्व. अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा!
वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन संजय पवार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. येत्या ऑक्टोबर महिन्यात जळगाव जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती त्यांनी दिली.
सभेत बँकेच्या इतरही विविध विषयांवर आणि प्रशासकीय कारभारावर सभासदांनी जाब विचारला.
