आमदार राजूमामा भोळे व महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या वाहनांना दाखवला हिरवा झेंडा
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या देशभक्तीपर रॅलीत सहभागी होण्यासाठी जळगाव शहरातील भाजपचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज खाजगी वाहनांचा ताफा घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.
उत्साहाच्या वातावरणात वाहनांना दाखवला हिरवा झेंडा
जळगावातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला भाजपचे स्थानिक आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सन्मानपूर्वक रवाना करण्यात आले. या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
देशभक्तीचा संदेश अन् तिरंग्याचा सन्मान
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात देशभक्तीची लाट निर्माण करणे आणि तिरंग्याचा सन्मान करण्याचा संदेश घराघरांत पोहोचवणे, हा या भव्य रॅलीचा मुख्य उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यक्रमात जळगावच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग नोंदवला जाणार आहे.
या वेळी भाजपचे विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीच्या जल्लोषात आणि अभूतपूर्व उत्साहात जळगावचे भाजप कार्यकर्ते या ऐतिहासिक रॅलीसाठी मार्गस्थ झाले आहेत.
