साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एका वेगळ्याच वादाने तोंड वर काढले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेल्या पेनच्या विश्वासार्हतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदान केंद्रात ठेवण्यात आलेला पेन हा ‘मॅजिक पेन’ असल्याचा संशय तायडे यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता थेट निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार करण्यात आली आहे.
नेमका आक्षेप काय?
मतदान प्रक्रिया सुरू असताना शरद तायडे यांनी मतदान केंद्रावरील पेनबाबत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. “हा मॅजिक पेन तर नाही ना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या पेनने केलेली नोंद किंवा खूण काही वेळानंतर पुसली जाण्याची किंवा बदलण्याची शक्यता असते, अशी चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात रंगत असते. त्यामुळे या पेनची फॉरेन्सिक किंवा तांत्रिक खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तायडे यांचे म्हणणे आहे.
”मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष राहणे लोकशाहीसाठी गरजेचे आहे. मतदारांचा विश्वास अबाधित राहण्यासाठी प्रत्येक लहान-सहान बाबीची पडताळणी झालीच पाहिजे. मात्र, यावर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.”
– शरद तायडे, उमेदवार (महाविकास आघाडी)
या गंभीर मुद्द्यावर मतदान केंद्रावरील उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचा दावा शरद तायडे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्रशासन म्हणते, ‘सगळं काही सुरळीत!’
तायडे यांच्या या आरोपामुळे मतदान केंद्रावर काही काळ कमालीचा तणाव आणि उलट-सुलट चर्चा पाहायला मिळाली. मात्र, निवडणूक प्रशासनाने हे आरोप फेटाळत मतदान प्रक्रिया पूर्णपणे नियमबद्ध आणि सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
आता लक्ष आयोगाच्या भूमिकेकडे
विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक मत आणि कोटा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा चुरशीच्या लढतीत ‘मॅजिक पेन’च्या संशयाने निवडणुकीत नवीन ट्विस्ट आणला आहे. आता या खळबळजनक तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो आणि यावर काही चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय धुरंधरांचे लक्ष लागले आहे.
