साईमत -जळगाव- प्रतिनिधी
लडाखमधील शैक्षणिक सुधारणा, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला १९ दिवस पूर्ण झाले आहेत. या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी जळगावातील जागरूक नागरिक व समविचारी व्यक्तींची बैठक गजानन मालपुरे यांच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये वांगचुक यांच्या मागण्यांचे समर्थन करत जळगावातून तीव्र आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, येत्या सोमवारी (दि. २०) दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
”विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशातील तरुणाईशी निगडित आहे. शिक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्याला पाठिंबा देणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे.”
या महत्त्वपूर्ण बैठकीस गजानन मालपुरे, शरद तायडे, ॲड. जमील देशपांडे, विनोद शिंदे, अशोक लाडवंजारी, जमील शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व समविचारी सामाजिक संस्था, युवक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक तसेच जागरूक नागरिकांनी या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक गजानन मालपुरे, जमील देशपांडे, जमील शेख, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, चंद्रकांत पाटील, विनोद शिंदे, सुनिल माळी, ज्ञानेश्वर कोळी, पियुष गांधी, प्रमोद पाटील, ललीत शर्मा, विनायक पाटील, चेतन पवार, प्रदिप पाटील, रमेश पाटील आदींनी केले आहे.
असे असेल आंदोलन…
दिवस : सोमवार
वेळ : दुपारी १२.०० ते १.००
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
