आठवडी बाजारातील नागरिकांच्या समस्या सोडविणार

0
3

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आठवडी बाजाराचे मागील आठवड्यात भूमिपूजन झाले होते. मात्र, हे भूमिपूजन झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेट देत स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदाराला बोलावून स्थानिक व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, याची दखल घेऊन आठवडी बाजारातील नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे भाई अशांत वानखेडे यांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आठवडी बाजाराचे मागील आठवड्यात भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजनानंतर स्थानिक व्यापाऱ्यांना समोरील सार्वजनिक वाचनालय परिसरात स्थलांतर करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय व होत असलेला संभ्रम या संभ्रमाचे निवारण करण्यासाठी भाई अशांत वानखेडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अभियंता कुलकर्णी, कर्मचारी व बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला त्या ठिकाणी बोलावून आठवडी बाजाराची पाहणी केली. हे बांधकाम दोन टप्प्यात करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याने संभ्रम दूर झाला. श्री.वानखेडे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात रस्ते व भाजी विक्रेत्यांसाठी ओटे बांधकाम करण्यात यावे. तसेच व्यापाऱ्यांनी दुसरीकडे स्थलांतरित न होता याच ठिकाणी आपल्या जागेचे व दुकानाचे विभाजन करून होणाऱ्या विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले.

योग्य न्याय मिळाल्याचा आनंद

आठवडी बाजाराचे भूमिपूजन झाल्यानंतर आम्हाला सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात स्थलांतर करण्याचे सांगण्यात आले होते. याकरिता आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणावर मुलींची शाळा, विविध सभा, संमेलने, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच होत असतात. त्यामुळे आम्हा सर्वांचीच होणारी गैरसोय आम्हाला मान्य नव्हती. त्यामुळे भाई अशांत वानखेडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना समस्या सांगितली. त्यानंतर ते तात्काळ आठवडी बाजारात पोहोचले. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचारी व ठेकेदाराला बोलावून योग्य तो न्याय मिळवून दिल्याबद्दल स्थानिक व्यापारी जाकीर शेठ यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here