मलिक कोणत्या गटात जाणार हे माहिती नाही

0
4

मुंबई ः प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला आहे.दरम्यान, नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ते तुरुंगात जाण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता पंरतु, आता या पक्षात अजित पवारांचा एक आणि शरद पवारांचा एक असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर आल्यावर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नवाब मलिक काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत. तत्पूर्वी रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नवाब मलिक यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे रुग्णालयात दाखल झाल्या
आहेत.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार सुळे यांना विचारले की, आता नवाब मलिक कोणत्या गटात जाणार आहेत?त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याची मला काहीच माहिती नाही. मी येथे पक्ष किंवा राजकारणी म्हणून नव्हे तर माझ्या मोठ्या भावाला भेटायला आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे, त्यामुळे मी इथे त्याला भेटायला आले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी अजित पवार यांच्या गटाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांनी बोलावल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि कप्तान मलिक यांनी अलिकडेच अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रविवारी (१३ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. त्यावर खडसे म्हणाले, ही गोष्ट येणारा काळच सांगू शकेल. यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवाब मलिक हे जर भारतीय जनता पार्टीत गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते कारण भारतीय जनता पार्टीकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here