धानोरा परिसरातील शेतशिवारात चोऱ्यांचे प्रमाणे वाढले

0
3

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

चोपडा तालुक्यातील धानोरासह परिसरात शेती शिवारात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सध्या उन्हाची चाहूल वाढलेली आहे. दुसरीकडे वीज पुरवठा सुरळीत नाही, अशा अनेक कारणांनी शेतकरी चांगलाच कचाट्यात सापडला आहे. दर आठवड्यात नेहमीच्या शेतातच चोरी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात येत आहे.

धानोरा गावासह बिडगाव, मोहरद, देवगाव, कुंड्यापाणी, पारगाव, मितावली आदी गावांमध्ये शेतातील केबल, स्टार्टर, कटआऊट या वस्तूंचे चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात चोऱ्यांचे प्रमाण धानोरा आणि मोहरद भागात जास्त आहे. त्यात एकाच रात्रीतून १५ ते २० शेतकऱ्यांचे शेतातून केबल, स्टार्टर आणि अन्य वस्तूंच्या चोऱ्या झालेल्या आहेत. त्यात गोपाळ महाजन, लोटू महाजन, यशवंत महाजन, भगवान महाजन, विजय महाजन, बाजीराव महाजन, फुलचंद महाजन, सुरेश महाजन, सीताराम महाजन, अशोक महाजन, नंदूलाल महाजन, प्रदीप महाजन यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

त्यात अज्ञात चोरटे हे रात्री शेतात घुसून साहित्याची चोरी तर करतच आहे. पण शेती साहित्याची तोडफोड होत असल्याने शेतकरी संतापलेले आहेत. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. तसेच रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहे. सध्या उन्हाची तीव्रता जास्त होत चालली आहे. दुसरीकडे वीजपुरवठा हा वेळेवर मिळत नाही. मिळणाऱ्या सहा तास विजेतही अनेकदा खंड होत असतो. तसेच होणाऱ्या चोऱ्यांनी साहित्याची नासधूस यामुळे ते दुरुस्त होण्यास विलंब लागत असतो. अशा सर्व कारणांमुळे पिकांना पाणी देता येत नाही. अशा ठोस कारणामुळे शेती करावी तर कशी? असा प्रश्‍न परिसरातील शेतकरी विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here