साईमत / नवी दिल्ली
दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अमर कॉलनी परिसरातील कैलाश हिल्स येथे एका तरुणीची घरात गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणी ही १९९७ बॅचमधील एका वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तरुणी घरात एकटीच होती. तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक आणि जिमसाठी बाहेर गेले होते. या दरम्यान आरोपीने घरात प्रवेश करून हा भयानक प्रकार घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आई-वडील घरी परतल्यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
प्राथमिक तपासात, मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून तरुणीची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निष्कर्ष पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात घरात काम करणाऱ्या एका माजी नोकरावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. सध्या तो बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जुन्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. संशयित आरोपी राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मृत तरुणीने नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते आणि ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. एका होतकरू आणि गुणी तरुणीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
