पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा योग दिनात सहभाग
साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी मुक्ताईनगर येथील जे.ई. स्कूलमध्ये योग प्राणायाम कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि योगाचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास प्राचार्य व्ही.एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही.के. शिर्के, पर्यवेक्षक के.आर. कवळे, व्ही.डी. बऱ्हाटे, योगशिक्षक एस.बी. वंजारी, क्रिडा शिक्षक एस.एम. वाढे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा शिक्षक एस.एम. वाढे यांनी केले. यावेळी योग प्राणायाम व विविध आसनांचे प्रात्यक्षिक योगशिक्षक एस.बी. वंजारी यांनी सादर केले. त्यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करत योग कसा करावा, कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राचार्य व्ही.एम. चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करताना योगामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते, तसेच एकाग्रता व शिस्त वाढते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रिडा शिक्षक एस.एम. वाढे, एस.जे. मोरे, एम.आर. चौधरी, एस.एन. भोळे तसेच सर्व शिपाई कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे फलक लेखन कलाशिक्षक एम.आर. सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी योगशिक्षक एस.बी. वंजारी यांनी आभार प्रदर्शन केले.
