विधान परिषदेच्या उमेदवारीवरून जिल्ह्यातील दोन मोठे नेते आमनेसामने
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |गाव विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपचे संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यात उमेदवारीवरून पडद्यामागे सुरू असलेली धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली आहे. दोघा बड्या नेत्यांनी एकमेकांवर जाहीरपणे पलटवार केल्याने जळगाव भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उघड झाली आहे.
नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीने ठिणगी!
जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून अचानक नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या जागेसाठी अनेक वजनदार नेते शर्यतीत असताना अनपेक्षित नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. या निर्णयाबाबत पत्रकारांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, त्यांनी “हा निर्णय माझा नसून थेट दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरून झाला आहे,” असे सांगत पक्षाकडे बोट दाखवले होते.
मी तर लहान कार्यकर्ता; रक्षा खडसेंचा गिरीश महाजनांना थेट टोला!
गिरीश महाजन यांच्या या विधानाचा समाचार घेताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. खडसे म्हणाल्या,
”जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच आहेत. मी तर पक्षाची एक लहान कार्यकर्ता आहे.”
संरक्षणमंत्री दर्जाच्या नेत्या असलेल्या रक्षा खडसे यांच्या या जाहीर विधानामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद समोर आली.
…तर ते वक्तव्य अत्यंत चुकीचे; गिरीश महाजनांचा आक्रमक पलटवार
रक्षा खडसेंच्या या टोमण्याला गिरीश महाजन यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. महाजन म्हणाले,
”उमदेवार हा कधीही माझा किंवा दुसऱ्या कोणाचा वैयक्तिक नसतो, तो पक्षाचा असतो. त्यामुळे त्यांनी (रक्षा खडसे) केलेले असे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे.”
जळगाव भाजपमधील गटबाजी पुन्हा चर्चेत
जिल्ह्यातील या दोन सर्वोच्च नेत्यांमध्ये जाहीरपणे रंगलेल्या या कलगीतुऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात काय वळण घेतो आणि याचे निवडणुकीवर काय पडसाद उमटतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
