भारताचे विश्वचषकाचेे स्वप्न तिसऱ्यांदा भंगले

0
19

अहमदाबाद : वृत्तसंस्था

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 6 गडी राखून पराभव झाला . रविवारी ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या पराभवाने भारतीय चाहत्यांना 2003 च्या विश्वचषक फायनलची आठवण करून दिली. 20 वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये कांगारूंनी भारताचा 125 धावांनी पराभव केला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 240 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 43 षटकांत 4 गडी गमावून 241 धावांचे लक्ष्य गाठले. ट्रॅव्हिस हेडने 137 धावांचे शतक झळकावले, तर मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. त्याआधी मिचेल स्टार्कने 3 तर कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच षटकात 15 धावा केल्या. दुसरे षटक टाकायला आलेल्या मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला स्लीपमध्ये कोहलीच्या हाती झेलबाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मिचेल मार्शने झटपट धावा काढल्या, पण त्याला जसप्रीत बुमराहने 5व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बुमराहनेही स्टीव्ह स्मिथला 7व्या षटकात एलबीडब्ल्यू केले. 47 धावांच्या स्कोअरसह 3 गडी गमावूनही संघाने 10 षटकांत 60 धावा केल्या. या विश्वचषकात टीम इंडिया पहिल्यांदाच ऑलआऊट झाली . भारतीय संघाकडून विराट कोहलीने 54 आणि केएल राहुलने 66 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र उर्वरित खेळाडूंना हा वेग कायम ठेवता आला नाही. ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.11 ते 40 षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्णपणे गेममध्ये होता. पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमावल्यानंतर भारताने 11 व्या षटकात तिसरी विकेटही गमावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here