साईमत वृत्तसेवा
आयपीएलच्या भविष्यासंदर्भात इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी केलेल्या एका धक्कादायक भविष्यवाणीने क्रिकेट विश्वात मोठी चर्चा निर्माण केली आहे. 2030 पर्यंत आयपीएलमधील एका खेळाडूचा करार 130 ते 150 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा दावा त्यांनी केला असून या विधानाने क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी तब्बल 1.63 अब्ज अमेरिकन डॉलरला विकली गेली, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ची किंमत 1.78 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. या प्रचंड आकडेवारीमुळे आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
सध्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघासाठी खेळाडू खरेदीसाठी 125 कोटी रुपयांचा पर्स निश्चित आहे. या रकमेतून संघांना 25 खेळाडूंचा संघ तयार करावा लागतो. ललित मोदी यांच्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांत हा पर्स 100 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 930 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
हा अंदाज खरा ठरल्यास संघांच्या खर्चात तब्बल सात पट वाढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
150 कोटींचा एक खेळाडू?
ललित मोदी यांनी मायकल वॉन यांच्या ‘द ओव्हरलॅप’ पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, 2030 पर्यंत आयपीएलमध्ये टॉप 3 ते 4 स्टार खेळाडूंना 130 ते 150 कोटी रुपयांचे करार मिळू शकतात. त्यांच्या मते, पुढील काही वर्षांत खेळाडूंच्या बोलीत पाच पटपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऋषभ पंतचे नाव पुढे आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर 26.75 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू सध्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेतील NFL (नॅशनल फुटबॉल लीग) ही जगातील सर्वात महागडी लीग मानली जाते. मात्र आयपीएलने NBA आणि MLB सारख्या प्रतिष्ठित लीगना मागे टाकल्याचा दावा क्रीडा आर्थिक विश्लेषकांकडून केला जात आहे.
ललित मोदींच्या या भाकितामुळे आयपीएलच्या आर्थिक संरचनेवर आणि खेळाडूंच्या कमाईवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, जर ही वाढ याच वेगाने सुरू राहिली, तर आयपीएल केवळ क्रिकेट लीग न राहता जागतिक क्रीडा उद्योगातील सर्वात मोठा आर्थिक ब्रँड बनू शकतो.
