भारतीय ध्वज संहितेचे पालन करण्यात यावे

0
4

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

शहरातील प्रत्येक शासकीय निमशासकीय व खासगी आस्थापनावर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्यांनी त्यांच्या इमारतींवर, नागरिकांनी त्यांच्या स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करावयाची आहे. राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर सिल्कपासून बनविलेल्या कापडाचे असावेत. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन आपल्या घरावर स्वयंस्फूर्तीने उभारणी करावयाची आहे. राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने सन्मानपूर्वक उभारणी करताना जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी, म्हणजे भारतीय ध्वज संहितेचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जळगाव मनपाचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासनाच्यावतीने केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत गतवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशाने साजरा केला. त्यानुसार जळगाव शहरातील ८० हजार नागरिकांनी मागीलवर्षी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवून आपल्या घरांवरती तिरंगा फडकविला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या सूचना शासनाने प्रशासनास दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक राज्यांमध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरीता अभियान राबविण्यात येत आहे.

तिरंगा फडकावून साजरा करा स्वातंत्र्य दिवस

जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची ज्वाजल भावना कायमस्वरूपी मनात रहावी, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतविलेली स्फूर्ती व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी. या उद्देशाने याहीवर्षी त्याच उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊन या “अमृत महोत्सव” वाटचालीत देशाने साध्य केलेल्या प्रगतीचा आनंद १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ या तीन दिवसाच्या कालावधीत तिरंगा फडकावून साजरा करून घेऊ, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here