सागर पार्क समोरील घटना : मारहाणीचा अधिकार अतिक्रमण पथकाला कोणी दिला?

0
3

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी

शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी मनपाने खास पथक तयार केले असून ते पथक अधूनमधून शहरातील विविध भागात अतिक्रमण हटावची मोहीम राबवित असतात. या मोहीमेचे जनतेकडून स्वागत केले जात असले तरी काही प्रसंगी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी हॉकर्सधारकांवर दबंगगिरी करीत असल्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. त्याचा प्रत्यय आज सकाळी सागर पार्क परिसरात आला.

मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळी आकाशवाणी चौफुली ते एसपी चौक दरम्यानच्या रस्त्यालगत व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या हॉकर्सधारकांविरूध्द मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असतांना सागर पार्कसमोर रस्त्यावरून लोटगाडीवर झाडांची रोपे विक्री करणाऱ्यास पथकातील कर्मचाऱ्यांनी अडविले व त्याची लोटगाडी जप्त करण्याची कारवाई करीत असतांना हॉकर्सधारकाने कारवाई न करता लोटगाडी सोडून देण्याची विनवणी केली मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याची विनवणी फेटाळून लावतांना त्यास धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यामुळे रोप विक्रेता अचानक मारहाण झाल्यामुळे गांगरून गेला.
रस्त्यावरील वहातुकीला अडथळा निर्माण होईल, असे अतिक्रमण काढून टाकण्याचे काम निर्मूलन पथकाचे असले तरी या संदर्भातील कारवाई करतांना पथकातील कर्मचाऱ्यांना हॉकर्स धारकाला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात साईमत प्रतिनिधीने महापौर जयश्रीताई महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यानंतर साईमत प्रतिनिधीने अतिरिक्त आयुक्त श्‍याम गोसावी यांच्याशी संपर्क केला असता, मुलाखती घेण्याच्या कामात असल्यामुळे त्यांनी बोलण्यास नकार दिला.

शहरातील हॉकर्सधारकांविरूध्द मनपा प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून त्याचाच भाग म्हणून आज सकाळी सागर पार्क परिसरात अतिक्रमण धारकांविरूध्द कारवाई करण्यात येत असतांना पथकातील कर्मचाऱ्यांनी रोप विक्रेत्याची गाडी तर जप्त केलीच पण त्यास धक्काबुक्की करीत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडल्यामुळे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. गोरगरीबांविरूध्द कारवाई करतांना त्यांना मारहाणही केली जाते. मात्र शहरात पक्के अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यांविरूध्द मात्र चुप्पी साधली जाते, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here