साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र विभागीय तंत्र (प्रोजेक्ट) प्रदर्शन अंतर्गत ‘इनोव्हेशन २०२४’ आर.ओ. निकम खासगी आयटीआय, गोंदूर बायपास रोड धुळे येथे आयोजित केले होते. प्रदर्शनात व्ही. एन. पाटील खासगी आयटीआय, नवलनगर संस्थेच्या प्रशिक्षणार्थीनी ‘सोलर ट्रेकर’ उपकरण सादर केले होते. त्या उपकरणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांसह स्टाफचे कौतुक केले. यात उत्तर महाराष्ट्र विभागातील अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता.
सोलर ट्रेकरबद्दल माहिती देताना संस्थेचे निदेशक सिद्दीक खान म्हणाले की, उपकरणामुळे सोलर वीज निर्मिती २५ टक्क्यांनी वाढते. उपकरणासाठी कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कॅम्पोनंटची आवश्यकता नसते. भविष्यात अशा उपकरणाची सोलर वीज निर्मितीसाठी आवश्यकता आहे. सोलर वीज निर्मितीसाठी त्याचा जास्त फायदा होईल. तंत्र प्रदर्शनासाठी जिल्हा प्रशिक्षण अधिकारी आणि शासकीय आयटीआय, धुळे येथील गट निदेशक उपस्थित होते. संस्थेच्या सर्व विजेत्या प्रशिक्षणार्थी आणि निदेशकांचे संस्थेचे प्राचार्य एस.टी. मोरे यांनी कौतुक केले.