वरणगावात पाणीपट्टी करातून जनतेची होतेय लूट

0
2

वरणगाव : प्रतिनिधी

शहरातील नागरिकांकडून नगर परिषद ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसुली करते. प्रत्यक्षात मात्र, महिन्यातून दोन ते तीनच वेळा असे किमान २०० दिवसच पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईच्या यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शहराला तापी नदी पात्रातील पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, तापी नदी पात्रात पाण्याचा मुबलक प्रमाणात जलसाठा असतानांही शहरवासियांना १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. १५ दिवसानंतर होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत आहे. त्यामुळे साठविलेल्या पाण्यात जंतुचा प्रार्दुभाव निर्माण होत आहे. मात्र, या प्रकाराकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी पुरवठ्याच्या होणाऱ्या विलंबाबाबत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. त्यामध्ये पाणी उपसा केंद्र (जॅकवेल) व जलशुध्दीकरण केंद्रावरील वारंवार वीज पुरवठा खंडीत तसेच वीजपंप नादुरुस्त होत असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे मात्र, शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाणीपट्टी ३६५ दिवसांची…प्रत्यक्षात पाणी २०० दिवसच

शहरातील नागरिकांना महिन्यातून दोन ते तीन वेळाच पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी केवळ २०० दिवसच पाणी पुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. असे असतांनाही नगर परिषदेकडून वर्षभराची पाणीपट्टीची रक्कम वसूल केली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. असे असतांनाही नगर परिषदेच्यावतीने लवकरच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासित करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here