साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार यांचे दि. १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. सोमवारी विद्यापीठात त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
प्राचार्य खैरनार यांचे हृदय विकाराने आकस्मिक निधन झाले. ते साक्री तालुक्यातील निजामपूर – जैताणे येथील आदर्श कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते प्राचार्य परिषदेचे सचिवही होते. त्यांच्यात पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
सोमवारी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य खैरनार यांना भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने केलेल्या प्रयत्नात प्राचार्य खैरनार यांचा मोठा वाटा होता अशी भावना प्रा. माहेश्वरी यांनी व्यक्त केली. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, प्रा. एस.आर.चौधरी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोकसभेसाठी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.