साईमत न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्र राज्यात सध्या तीव्र उष्णतेसोबतच पूर्वमोसमी वादळी पावसाची दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून काही भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुसरीकडे मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा उच्चांक नोंदवण्यात आला. अमरावती, वर्धा, अकोला, ब्रह्मपुरी आणि यवतमाळ येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. तर परभणी येथे ४४ अंश, तसेच जळगाव, सोलापूर, नागपूर, वाशीम आणि चंद्रपूर येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. याउलट महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी २०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान-निकोबार परिसरात प्रवेश केला असून मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ५ ते ६ जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनमुळे दिलासा मिळण्याची आशा आहे.
